यवतमाळ , अमरावती , अकोला जिल्ह्यालगतच्या सीमांकडे ग्रामीण पोलिसांचे विशेष लक्ष.
बंद केलेल्या सिमांची दररोज तपासणी
कारंजा लाड दि २७ ( कारंजा हुंकार )
कोरोणा मुक्त वाशिम जिल्ह्यातील कारंजा ग्रामीण पोलिस स्टेशन च्या कार्यक्षेत्राला लागून असलेल्या रेड झोन मधील यवतमाळ , अकोला , अमरावती जिल्ह्याच्या सीमांकडे कारंजा ग्रामीण पोलिस स्टेशन चे ठाणेदार दिगांबर इंगळे जातीने लक्ष देत असॢन बंद केलेल्या सीमांची दाररोज तपासणी करण्यात येत आहे.
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता प्रशासनाने 3 मेपर्यंत संपूर्ण देशात टाळेबंदी जाहीर केली असून, सर्व रेल्वे, विमान, खाजगी व सरकारी वाहतूक सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे रेड झोन जिल्ह्यांचा ग्रीन झोन जिल्ह्याशी संबंध पूर्णपणे बंद केला आहे. अत्यावश्यक सेवा पुरविणार्या परवानाधारक वाहनांना फक्त वाशिम जिल्ह्यात प्रवेश देण्यात येत आहे .
पोलिस विभाग दिवसरात्र सतर्क राहून यवतमाळ , अकोला , अमरावती जिल्ह्यातून येथून कारंजा तालुक्यात शिरकाव करणार्या बेजबाबदार वाहनांना अडवून कारवाई करीत आहे. सर्व सीमा बंद असताना यवतमाळ , अकोला , अमरावती जिल्ह्यातील काही बेजबाबदार नागरिक वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात ग्रामीण भागातील चोरट्या मार्गाने प्रवेश करताना दिसत होते. मुख्य मार्ग बंद असून पोलिस तैनात असल्याने ग्रामीण क्षेत्रातील रस्त्यांचा मोठ्या प्रमाणात वापर वाढला होता.
कारंजा तालुक्याला दारव्हा , नेर परसोपंत , नांदगाव खंडेश्वर , मूर्तीजापुर , बारशिटाकळी तालुका अगदी लागून असल्याने ग्रामीण भागातील चोरट्या मार्गाने कारंजा तालुक्यात मोठ्या प्रमाणात प्रवेश करीत होते. त्यामुळे सरपंच पोलीस पाटला च्या सहकार्याने ग्रामीण भागातील चोरटे मार्ग पुर्ण पणे बंद केले आहे . दररोज पोलिस कर्मचारी पोलीस पाटील , सरपंच पोलीस मित्र यांच्या माध्यमातून पहारा राहतो.
वाशिम जिल्ह्यात सध्या कोरोनाचा एकही रुग्ण नसून, जिल्हा सुरक्षित रहावा यासाठी कारंजा ग्रामीण पोलिस स्टेशन चे ठाणेदार दिगांबर इंगळे व उपपोलीस निरीक्षक निलेश शेंबाळे सर्व सीमांवर पोलीस कर्मचारी वर्गाच्या सहकार्याने लक्षे देत आहेत.
यवतमाळ , अमरावती , अकोला जिल्ह्यालगतच्या सीमांकडे ग्रामीण पोलिसांचे विशेष लक्ष. बंद केलेल्या सिमांची दररोज तपासणी
• ankush kadu