सीसीआय व फेडरेशनची कापूस खरेदी त्वरित सुरू करावी
आमदार पाटणी यांची मुख्यमंञ्यांकडे मागणी
कारंजा लाड दि २५ कारंजा हुंकार
कारंजा: महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाने कापूस खरेदी सुरु करण्याचे आदेश २० एप्रिल रोजी निर्गमित केले. कापूस खरेदी केंद्राशी निगडीत अटी-शर्ती नूसार मार्च आणि एप्रिलच्या निकषात फारमोठी तफावत असल्यामुळे कापूस खरेदी केंद्र कपाशीची खरेदी करतांना दिसत नाही. करारनाम्यातील अटी व शर्ती शिथिल करण्यासंदर्भात भाजपा जिल्हाध्यक्ष आ.राजेंद्र पाटणी यांनी मा.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनाव्दारे मागणी केली असुन तशा प्रकारचे आदेश काढण्यासंदर्भात संबंधित विभागाला कळवावे करिता विनंती केली आहे. याबाबत त्यांनी मा.मुख्य सचिव, कृषी मंत्री, पणन मंत्री/सचिव, पालकमंत्री, आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांना देखील निवेदनाव्दारे कळविले आहे.
आमदार पाटणी यांचे निवेदनानुसार वाशिम जिल्हयात मोठया प्रमाणात शेतकरी वर्गाकडे मार्च महिन्यापासून कापूस विक्री करावयाचा शिल्लक राहीला आहे. महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाने जिल्हयात कापूस खरेदी सुरु करण्याचे आदेश दि.२०/०४/२०२० रोजी निर्गमित केले आहे. परंतु कापूस खरेदी केंद्रासोबत झालेल्या करारनाम्यात दिलेल्या अटीनूसार मार्च आणि एप्रिल मध्ये कापूस खरेदी करावयाच्या निकषामध्ये फरक असल्याने कापूस खरेदी केंद्र कापूस खरेदी करण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. मार्च महिन्यामध्ये रुईचा उतारा ३४.१० होता व घट २.२५ टक्के होती, ती एप्रिल महिन्यामध्ये ३४.६० व घट २ टक्के आहे, राज्यात मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरु झाल्याने मार्च पूर्वीपासूनच शेतकरी वर्गाकड मोठया प्रमाणात कापूस विक्री करण्याचा शिल्लक आहे. जर हा कापूस खरेदी केंद्राने एप्रिलच्या निकषानूसार खरेदी केला तर यातील तफावत खरेदीदाकडून वसुली होणार असल्याने जिल्हयात कापूस खरेदी केंद्र सुरु झालेले नाहीत.
करारनाम्यातील अटी शिथिल करुन एप्रिल आणि मे महिन्यात होणारी खरेदी मार्चच्या कापूस खरेदीच्या अटी नूसार खरेदी करण्यासाठी संबंधीत विभागाला आदेशीत करावे, अशी आग्रहाची मागणी त्यांनी मा.मुख्यमंत्री ना.उध्दवराव ठाकरे यांचेकडे केली आहे. याबाबत त्यांनी कृषीमंत्री ना.दादाजी भूसे, पालकमंत्री ना.शंभुराजे देसाई, पणन मंत्री ना.बाळासाहेब पाटील, मुख्य सचिव, सचिव कृषि, सचिव पणन, आयुक्त अमरावती तसेच जिल्हाधिकारी वाशिम यांना निवदनाव्दारे कळविले आहे.