मास्क नसल्यास रुमाल, गमछा किंवा स्कार्प तसेच घरी बनविलेले मास्कही चालतील
मात्र तोंड, हनुवटी संपूर्ण मास्कप्रमाणे झाकले जाणे गरजेचे
कारंजा (कारंजा हुंकार ) दि.१३ - केंद्र तसेच राज्य शासनाचे निर्देशानुसार कोरोना ह्या रोगाच्या प्रतिबंधासाठी प्रत्येक नागरिकाने सुरक्षा म्हणून मास्क लावणे हे बंधनकारक करण्यात आले आहे. वाशिम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार मास्क शिवाय आढळून आल्यास २०० रुपये दंड जागेवरच वसुल करण्यात येणार आहे. तसेच याचे वारंवार उल्लंघन करणार्यावर १८८ अन्वये फौजदारी कार्यवाही करण्याचे आदेश पोलिस प्रशासनाला देण्यात आलेले आहेत.
दोन दिवसांपुर्वी मुख्यमंत्र्यांचे झालेल्या बैठकीत खुद्द देशाचे शिर्ष नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घरी बनविलेले मास्क घालून सहभागी झाले होते. नागरिकांनी मेडीकलवर मिळणार्या मास्कचा दुराग्रह सोडून स्वरक्षणार्थ व इतरांचेही प्राणाची काळजी घेतांना घरी बनविलेले मास्क, रुमाल, स्कार्प किंवा गमछा चे वापर करता येऊ शकते असे आपले कृतीतून संपूर्ण भारतवासीयांना निर्देशीत केले होते.
प्रत्येक व्यक्तीचे तोंड, हनुवटी संपूर्ण मास्कने जशी झाकल्या जाते तशी झाकल्या जाणे गरजेचे आहे. त्यानुसारच जर मास्क नसतील तर रुमाल, स्कार्प, गमछा किंवा घरी बनविलेले मास्कचा वापरही करता येऊ शकतो असे वाशिमचे जिल्हाधिकारी मा.हृषीकेश मोडक यांनी एका आदेशान्वये कळविले आहे.