अमरावती - बदलीच्या मागणीसाठी महावितरण कार्यालयासमोर दहा दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या वीज कर्मचाऱ्यांपैकी निखिल तिखे यांचे शुक्रवारी (दि. १९) लग्न होणार आहे. मात्र वीज कंपनीने अद्यापही त्यांच्या आंदाेलनाची दखल न घेतल्याने निखिल यांनी उपाेषण मागे न घेण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी बुधवारी त्यांना उपाेषणाच्या मांडवातच मेंदी लावण्यात आली, तर गुरुवारी हळदी लावण्यात आली. तोडगा न निघाल्यास शुक्रवारी लग्नसुद्धा याच मंडपात लागणार असल्याचे तिखे यांचे नातेवाईक व वीज कर्मचारी संघटनेने सांगितले. दरम्यान, याप्रकरणी तिखे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे सूतोवाच मुख्य अभियंता यांनी केले आहे.
‘महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन’च्या नेतृत्वात निखिल तिखे व अन्य सहा कर्मचाऱ्यांनी ९ जुलैपासून येथील मुख्य अभियंता कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. तिखे यांचे १९ जुलैला लग्न आहे, मात्र बदलीची मागणी मान्य हाेत नसल्याने तिखे उपाेषणावर ठाम आहेत. मग कुटुंबीयांनीही त्यांच्या निर्णयाला साथ दिली. बुधवारी तिखे यांना उपाेषणाच्या मांडवातच मेंदी लावली, गुरुवारी हळदही लावली. या वेळी निखिल यांचे सहकारी, फेडरेशनचे पदाधिकारी तसेच नातेवाइकांची मोठ्या संख्येत हजेरी होती. हा आगळावेगळा हळदीचा कार्यक्रम रस्त्याने ये - जा करणारे लाेक कुतूहलाने पाहत हाेते.
उपोषणकर्ता निखिलची आई भावुक मुलाच्या लग्नाची अनेक दिवसांपासून तयारी सुरू हाेती. घरी सर्व पाहुणे मंडळी आली. मुलाचे थाटामाटात लग्न करण्याचे स्वप्न. त्यासाठी मंगल कार्यालयसुद्धा ठरवले. मात्र महावितरणकडून मागणी मान्य न झाल्यामुळे मुलगा उपोषण साेडण्यास तयार नाही. त्यामुळे नाइलाजाने रस्त्यावर मुलाला हळद लावावी लागल्याचे पाहून निखिल यांच्या आईच्या डोळ्यात अश्रू तरळत होते.
कठोर कारवाई करणार महावितरण कार्यालयासमोर बदली प्रक्रियेशी संबंधित उपोषण सुरू आहे. याच उपोषण मंडपात एका उपोषणकर्त्या कर्मचाऱ्याने लग्नाचे कार्यक्रम सुरू केले. हा प्रकार प्रशासनाची बदनामी करण्याचा तसेच महावितरणला वेठीस धरण्याचा व प्रतिमा मलिन करण्याचा आहे. त्यामुळे या आडमुठ्या धोरणाची महावितरणने गंभीर दखल घेत उपोषणकर्त्यावर शिस्तभंगाचा ठपका ठेवत कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. सुचित्रा गुजर, मुख्य अभियंता.