पोलिसांना हवी सुरक्षा साधने
जीवाची बाजी लावून कोरोनात करतायेत काम
लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा
कारंजा (लाड):- प्रतिनीधी :- सुनील फुलारी
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये. यासाठी, कारंजा शहर व ग्रामीण पोलीस यंत्रणा जीवाची बाजी लावून काम करीत आहे. त्यांना पुरेशी सुरक्षा मिळावी. यासाठी, आवश्यक कीट उपलब्ध होण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज आहे. कारण, जान है तो जहाँ है हे पोलिसांना लागू पडत नाही का?
देशात, राज्यात कोरोनाचे थैमान गेले काही दिवस सुरु आहे. प्रशासन, शासन यंत्रणा आपआपल्या सर्व ताकदीनिशी कार्य करीत आहे. हे निश्चितच कौतुकास्पद आहे. मात्र, गेल्या 20 मार्च पासून सातत्याने पोलीस यंत्रणा आपली तमा न बाळगता महत्वाची जनसेवा जीवाचे रान करून बजावत आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या पोलिसांकडे मास्क व्यतिरिक्त कोणतेही साहित्य नसल्यामुळे अशा परिस्थितीत सुद्धा अनेक संकटांवर मात करीत शिवाय आपल्या घरावर तुळशी पत्र ठेऊन या संकटावर मात करण्यासाठी दिवसरात्र जनतेची सेवेत उभा ठाकला आहे.
कारंजा तालुक्याचा विचार करता तालुक्यात आधीच पोलीस बळ मुळातच कमी असल्यामुळे त्यांना या कोरोना संचार बंदी कालावधीत आपले कर्तव्य बजावताना तारेवरची कसरत करून सुद्धा या धगधगत्या उन्हात आपली भूमिका योग्यरित्या पार पाडत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारंजा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश पाटील आपल्या ताफ्यासह शहरातील सर्वच ठिकाणी पोलीस यंत्रणा अतिशय चांगली वाखाणण्याजोगी सेवा बजावत आहे. स्थानिक तहसीलदार धीरज मांजरे सुद्धा आपल्या महसूल विभागासह खांद्यालाखांदा देऊन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. सामाजिक बांधिलकीतून सेवा बजावताना कुटूंबापेक्षा सर्व समाज आपले कुटुंब आहे. या भावनेतूनच सर्व कारंजा पोलीस प्रशासन कार्यरत झाले असल्याचे दिसून येत आहे. ही सेवा बजावत असतांना त्यांच्या सुरक्षिततेसाठी कुठलीही स्वतंत्र अशी व्यवस्था केलेली नाही. याची मात्र, शासन पातळीवर प्राधान्याने दखल घेणे गरजेचे आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी या गांभीर्याची दखल घेऊन शासन दरबारी 'सिक्युरिटी किट' साठी लोक प्रतिनिधींनी पाठपुरावा केला पाहिजे.
सद्य परिस्थितीत विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने 24 तास घराबाहेर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना आपले कर्तव्य बजावतांना कधी सीमाबंदीवर, तर कधी गर्दी आटोक्यात आणण्यासाठी, तर कधी अपघात घडल्यास जखमींच्या, तर, कधी दगावलेल्या रुग्णांच्या मदतीला सर्वप्रथम त्याठिकाणी जनतेचे सेवक पोलिसच धावतात. अशावेळी, आपल्या कर्तव्याचे पालन करतांना संपर्कात आलेली व्यक्ती कोरोनाबाधित आहे कि नाही? हे त्या पोलीस बांधवांना माहिती नसते? मात्र, त्यांची सेवा करण्याचे काम पोलीस यंत्रणाच करीत असते. अशावेळी, दुर्दैवाने संपर्कात आलेली व्यक्ती कोरोनाबाधित आढळली. तर, याठिकाणी, कार्यरत असणाऱ्या पोलिसांना अनेक संकटांना सामोरे जावे लागणार आहे. आजमितीला राज्यातील काही ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांना या आजाराची लागण झाली असल्याच्या घटना समोर येत असतांना या गांभीर्याची दखल राज्याने घेणे गरजेचे आहे. शिवाय, स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांचा आरोग्याचा सर्व दृष्टिकोनातून विचार करता 'सिक्युरिटी किट'साठी शासन दरबारी लोकप्रतिनिधींनी तगादा लावणे तितकेच महत्वाचे असल्याची चर्चा सुजाण नागरिकांमध्ये केल्या जात आहे.