पर्यटकांनी कोरोना रोगाची सुधारणा होईपर्यंत राळेगणसिद्धीला येण्याचे टाळावे
अण्णा हजारे
(कारंजा लाड) — राळेगणसिद्धी ता. पारनेर जि. अहमदनगर येथे ग्रामविकासाचे कार्य पाहण्यासाठी देशातील विविध राज्यातून व महाराष्ट्र राज्यातून त्याचप्रमाणे विदेशातून पर्यटक येत असतात. सध्या जगभर कोरोना हा संसर्गजन्य रोग पसरतो आहे. आपल्या भारतातही कोरोना व्हायरसने प्रवेश केला आहे. महाराष्ट्र राज्यातही या रोगाने शिरकाव केलेला आहे. कोरोना हा संसर्गजन्य रोग असल्याने आणि जीवघेणा असल्याने संसर्ग होऊ नये यासाठी आम्ही राळेगणसिद्धी परिवाराने निर्णय घेतला आहे की, हा रोग आटोक्यात येत नाही तोपर्यंत राळेगणसिद्धीमध्ये पर्यटकांनी येऊ नये. आजपर्यंत राळेगणसिद्धी येथे 16 लाखापेक्षा ज्यास्त पर्यटक राज्य व देश-विदेशातून आलेले आहेत. विशेषतः अण्णा हजारेंशी फोटो काढून घेण्याची पर्यटकांची अपेक्षा असते.
कोरोना विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीत संक्रमित होत असल्याने त्याचा धोका अधिक वाढला आहे. त्यामुळे गाव, परिसर, राज्य व देशातील लोकांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने खबरदारी म्हणून पर्यटकांनी कोरोना रोगाची सुधारणा होईपर्यंत राळेगणसिद्धीला येण्याचे टाळावे अशी प्रेमाची विनंती करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सर्व नागरिकांनी न घाबरता या रोगाला धैर्याने तोंड देण्यासाठी जे जे पथ्य सांभाळावे लागतात ते सांभाळावे. म्हणजे या रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही.
धन्यवाद.