जिल्हा परिषद शाळांचे विद्यार्थी घेत आहेत ऑनलाईन टेस्ट सोडविण्याचा आनंद
जि. प. प्रा. शाळा, घोटा चे मुख्याध्यापक सचिन न. विटाळकर यांनी बनविल्या ऑनलाईन टेस्ट
अमरावती — जनक बागडे ( कारंजा हुंकार )
तिवसा : कोरोना विषाणूने संपूर्ण जगभर थैमान घातले आहे. भारतात सुद्धा परिस्थिती वेगळी नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १६ मार्चपासून सर्वत्र लॉकडाऊन मुळे शाळा बंद आहेत. वास्तविक पाहता हा काल सर्वांच्या परीक्षांचा. या परिस्थितीत परीक्षा कशा घ्याव्या ह्याबाबत विचार करताना जि. प. प्रा. शाळा, घोटा चे शिक्षक तथा प्रभारी मुख्याध्यापक सचिन न. विटाळकर यांच्या डोक्यात एक नवीन कल्पना आली, ती म्हणजे विद्यार्थ्यांना ऑनलाईन टेस्ट सोडविण्याची संधी देण्याची. शिकविणे बंद व परीक्षा रद्द झाल्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सचिन विटाळकर यांनी मराठी, इंग्रजी, गणित व परिसर अभ्यास या विषयांच्या काही ऑनलाईन टेस्ट स्वतः तयार केल्या. शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांचे वर्गनिहाय whatsapp गृप तयार केले असून त्या गृपवर ह्या ऑनलाईन टेस्ट विद्यार्थ्यांना सोडविण्यासाठी नियमीत पाठविल्या जात आहेत. तसेच विविध शैक्षणिक videos, worksheets च्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा अभ्यास घेतला जात आहे. ह्या ऑनलाईन टेस्ट सोडविल्यानंतर त्या टेस्टचा निकाल विद्यार्थ्यांना लगेच कळतो. मोबाईलवर game खेळण्यासाठी मोबाईलचा अनावश्यक वापर करणारे विद्यार्थी ह्या टेस्ट सोडविण्यात दंग झाले आहेत. त्यातून विद्यार्थी उत्कृष्टरित्या अभ्यास करत आहेत.
पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
या उपक्रमाला पालकांचा व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पालक आपल्या पाल्यांकडून ह्या ऑनलाईन टेस्ट सोडवून घेत आहेत. स्वतःच्या शाळेसोबत इतर शाळांच्या विद्यार्थ्यांना ह्या टेस्ट विविध whatsapp गृपच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जात आहेत. तिवसा तालुक्यातच नव्हे तर अमरावती जिल्ह्यातील इतरही तालुक्यांतील शाळांचे विद्यार्थी सुद्धा ह्या टेस्ट सोडविण्याचा आनंद घेत आहेत. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये whatsapp गृपच्या माध्यमातून ह्या टेस्ट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्या असून विद्यार्थांनी सोडविल्या आहेत. ह्या ऑनलाईन टेस्ट विद्यार्थ्यांकरिता उपलब्ध करून दिल्याबद्दल समस्त मित्रमंडळीकडून, गावकऱ्यांकडून तथा अधिकाऱ्यांकडून सचिन विटाळकर यांचे कौतुक होत आहे.