अमरावती - सुमारे साडेचारशे विद्यार्थ्यांची खिचडी शिजवून संसारही सांभाळायचा. या कामानंतर दररोज पुस्तक, वृत्तपत्र वाचायचे आणि बातम्यासुद्धा पाहायच्या, यातूनच सामान्यज्ञान आणि चालू घडामोडींबाबतचे ज्ञान वाढवले. वाचनाच्या या जिद्दीमुळेच आपण ‘कौन बनेगा करोडपती’पर्यंत जाऊन समाधानकारक बक्षिसाची रक्कम जिंकल्याचे अंजनगाव सुर्जी येथील बबिता ताडे (४०) यांनी ‘दिव्य मराठी’सोबत बोलताना सांगितले. पती सुभाष यांनीही केवळ जिद्दीच्या जोरावर बबिता यांनी हे यश मिळवल्याचे सांगितले.
अंजनगगाव सुर्जी येथील पंचफुलाबाई हरणे विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी खिचडी शिजवण्याचे काम करणाऱ्या बबिताताईंनी ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये जाऊन आणि मोठी रक्कम जिंकून अमरावती जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. बबिताताईंचे पती पंचफुलाबाई हरणे विद्यालयात शिपाई आहेत. सुरुवातीपासून वाचनाची जिद्द असलेल्या बबिताताईंना स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करून अधिकारी व्हायचे होते, मात्र ते स्वप्न पूर्ण झाले नाही. दरम्यान, स्पर्धा परिक्षेची तयारी बंद केली तरी वाचन व बातम्या पाहणे, वृत्तपत्र वाचन त्यांनी सुरूच ठेवले होते. त्यामुळे “कौन बनेगा करोडपती’च्या मंचावर आपण पोहोचू आणि सक्षमपणे खेळू असा विश्वास होताच. दरम्यान, मागील अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण झाले आणि ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये खेळण्याची संधी मिळाली.
पुस्तक हाती घेतले की, पूर्ण झाल्यावरच ठेवते वाचनाची प्रचंड आवड असल्यामुळे कोणतेही पुस्तक वाचनासाठी हातात घेतले की, ते पूर्ण वाचून झाल्यानंतरच खाली ठेवते. कारण वाचनाची प्रचंड जिद्द आहे. त्याचबरोबर दरदिवशी वृत्तपत्र वाचणे, बातम्या पाहणे, चालू घडामोडींचे पुस्तकांचे वाचन करणे यामुळेच कौन बनेगा करोडपतीपर्यंत पोहचल्याचे बबिताताईंनी सांगितले.
जिद्दीमुळेच यश मिळाले :
बबिता सुरुवातीपासूनच वाचनाच्या बाबतीत प्रचंड जिद्दी आहे. त्यामुळेच तिला यश मिळाले. या यशामुळे आम्ही प्रचंड आनंदी आहोत. ती ‘कौन बनेगा करोडपती’ खेळणार हा विश्वास होता आणि तिने खरा करून दाखवला, असे बबिता यांचे पती सुभाष ताडे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.