रास्त भावात विनाअट सर्वांना धान्य द्यावे
मो.युसूफ पुंजानी यांनी दिले जिल्हाधिकारी यांना निवेदन
कारंजा (लाड)
दैनंदिन मजुरीवर अवलंबून असलेल्या काही नागरिकांना तांत्रिक कारणामुळे रास्त भावात धान्य मिळालेले नाही.अशा या नागरिकांवर 'लॉक डाऊन' असल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. या नागरिकांना विनाअट स्वस्त धान्य दुकानांमध्ये धान्य देण्यात यावा अशी मागणी मो.युसूफ पुंजानी यांनी तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनामध्ये नमूद केले आहे की,कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या प्रादुर्भावास व प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ लागू करण्यात आला असून संपुर्ण देशामध्ये 'लॉक डाऊन' करण्यात आले आहे.मात्र या 'लॉक डाऊन' मुळे दैनंदिन रोजंदारीवर अवलंबून असलेल्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे.अशातच शासनातर्फे रेशन कार्ड धारकांना रास्त भावात राशन मिळाल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र अद्यापही काही लोकांजवळ रेशन कार्ड नसल्यामुळे तसेच काहींचे रेशन कार्ड ऑनलाईन (Online) न झाल्यामुळे त्यांना राशन मिळाले नाही. राशन न मिळालेल्या लोकांवर सध्या उपासमारीची वेळ आलेली आहे. यामुळे या संकटकाळात या गरजूंना मदत होईल व कोणावरही उपासमारीची वेळ येऊ नये ह्या उद्देशाने वंचित रचलेल्या सर्वांना विनाअट धान्य तातळीने उपलब्ध करून घ्यावे अशी मागणी पुंजानी यांनी केली आहे.