रुंदीकरण व खोलीकरणामुळे भर उन्हाळ्यातही नदीपात्रात पर्याप्त जलसाठा
अवकाळी पावसाचा परिणाम : शेतकऱ्यांना मिळाला दिलासा
उंबडाॅबाजार प्रतिनीधी ( कारंजा हुंकार )
उंबडाॅबाजार सह परिसरातील गावात जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून नदीपात्राच्या रुंदीकरणासह खोलीकरणामुळे भर उन्हाळ्यातही अवकाळी आलेल्या जोरदार पावसाने नदीपात्रात पर्याप्त जलसाठा उपलब्ध असल्याने परिसरातील गावांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सविस्तर असे की उंबडाॅबाजार सह परिसरातील अनेक गावात उन्हाळ्यात जाणवणारी पाणी टंचाई लक्षात घेता गावालगतच्या नदी नाल्याच्या पात्रातील पाण्याची पातळी फेब्रुवारी २०१८ मध्ये अंत्यत कमी झाल्याने तसेच २०१९ मध्ये नदीचे पात्रच कोरडे झाल्याने परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागल्या होत्या.
हीच बाब लक्षात घेऊन ग्राम स्तरावरील पदाधिकारी व अधिकारी यांच्या माध्यमातून तथा कृषी विभागाच्या देखरेखीखाली राबविण्यात येणारी जलयुक्त शिवार योजनेची कामे करण्यात आली
दरम्यानच उंबडाॅबाजार सह परिसरातील अनेक गावातील नदी व नाल्याचे खोलीकरण करण्यात आले . मागील वर्षी उशीरा पाऊस पडल्यामुळे जून व जुलै महिन्यात सदर रुंदीकरण व खोलीकरण करण्यात आले.
मागील वर्षी करण्यात आलेल्या या नदीपात्राच्या कामाचे परिणाम आता दिसून येत आहेत. सध्या एप्रिल महिन्याच्या मध्यातही अनेक नदी नाल्याचेपात्र तुडुंब भरले असून नदीपात्रात पर्याप्त जलसाठा दिसून येत आहे. नदी नाल्याच्या रुंदीकरण व खोलीकरणामुळे हे सर्व शक्य झाले आहे.
याचाच फायदा म्हणून आता भर उन्हाळ्यातही अनेक नदी नाल्याच्या पात्रात पर्याप्त जलसाठा उपलब्ध असल्याचे दिसून येते. याचा निश्चितच फायदा परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या जलस्त्रोतासह शेतकऱ्यांना होणार असून जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील निकाली निघाला आहे. नदी पात्राच्या रुंदीकरणासह खोलीकरणामुळे परिसरातील नागरिकांना एकप्रकारे मोठा दिलासाच मिळाला असल्याचे पहावयास मिळत आहे
रुंदीकरण व खोलीकरणामुळे भर उन्हाळ्यातही नदीपात्रात पर्याप्त जलसाठा