पालघर येथील संतांची निर्घृण हत्येप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी व कारवाई मागणी
भाजपा जिल्हाध्यक्ष आ.पाटणी यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
कारंजा ( कारंजा हुंकार ) पालघर जिल्ह्यात जुना आखाड्याचे संत कल्पवृक्षगिरी महाराज आणि सुशीलगिरी महाराज, तसेच त्यांचा वाहनचालक यांना हिंसक जमावाने पोलिसांसमोरच प्रचंड मारहाण करून त्यांची निर्घृण हत्या (मॉब लिंचिग) केली. यासंदर्भात समोर आलेल्या व्हिडिओमध्ये पोलीसच ‘त्या’ वयोवृद्ध संतांना हिंसक जमावाकडे सोपवत असल्याचे आणि पोलिसांसमोरच त्यांची निर्घृण हत्या होत असल्याचे भीषण सत्य उघड झाले आहे. जनतेच्या सुरक्षेचे दायित्व असणारे पोलीसच हत्या करणार्यांना सहाय्य करत असतील, तर जनतेने कुणाच्या भरवशावर रहायचे? त्यामुळे संबंधित पोलिस कर्मचार्यांसह अन्य आरोपींची उच्चस्तरीय चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष आ.राजेंद्र पाटणी यांनी २१ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी वाशिम यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे. यावेळी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष राजीव पाटील राजे, वाशिम न.प.उपाध्यक्ष बापुभाऊ ठाकुर, माजी नगराध्यक्ष मिठुलाल शर्मा, नगरसेवक संतोष मुरकुटे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांना निवेदनानुसार सदर घटना दि. १६ रोजी घडली. त्याची व्हिडीओ क्लिप दि. १९ रोजी समाजमाध्यमांतून व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त झाला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते ना.देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आवाज उठवला. त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारला जाग आली. राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांना या भयानक हत्याकांडाची सरकारी यंत्रणेकडून तातडीने माहिती मिळाली असेलच. तथापि, त्यांनी त्याबाबत चार दिवसांनी दि. २० रोजी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जाहीर प्रतिक्रिया व्यक्त केली. आपल्या राज्यात साधूंची हत्या झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने स्वतः या घटनेची राज्याला माहिती देऊन संबंधितांवर कारवाईची खबरदारी घेणे अपेक्षित होते. केंद्रीय गृहमंत्री ना.अमित शाह यांनी स्वतः चौकशी करेपर्यंत आणि विरोधी पक्षनेत्यांनी आवाज उठवेपर्यंत मा.मुख्यमंत्र्यांना याबाबत जनतेशी बोलावेसे वाटले नाही, याचा आम्ही निषेध करतो.
या विषयी बोलताना मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी राज्यात मॉब लिंचिंगचे प्रकार घडले होते, सदर घटना गैरसमजातून घडली आणि केंद्रशासित प्रदेशात साधूंना रोखले असते तर असे घडले नसते अशा सबबी सांगून पोलिसांच्या साक्षीने झालेले हे हत्याकांड किरकोळीत काढण्याचा प्रयत्न केल्याचे जाणवते. अशा प्रकारे या हत्याकांडावर पांघरूण घालण्याच्या प्रयत्नाचा आम्ही निषेध करतो.
राज्यात गेल्या नोव्हेंबरमध्ये महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर कायदा व सुव्यवस्था स्थिती ढासळली आहे. गेल्या काही दिवसात गंभीर घटना घडल्या आहेत. ठाण्यात एका तरुणाला एका मंत्र्याच्या बंगल्यात नेऊन मारहाण करण्यात आली, हजारो कोटींच्या गैरव्यवहारात तपास यंत्रणांना हवा असलेल्या आरोपीला राज्याच्या गृहखात्याच्या वरिष्ठ अधिकार्याकडून लॉकडाऊनच्या काळात सवलत देण्यासाठी पत्र देण्यात आले, लॉकडाऊनमुळे संचारबंदी असताना तसेच चौकाचौकात पोलिसांचा बंदोबस्त असतानाही बांद्रा येथे हजारोंचा जमाव जमला आणि आता पालघर जिल्ह्यात पोलिसांच्या साक्षीने साधूंचे हत्याकांड झाले. मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनांबद्दल गृहमंत्री अनिल देशमुख यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी व वरील घटनांची निःपक्ष चौकशी करावी, अशी मागणी वाशिम जिल्हा भाजपाच्यावतीन करण्यात आली आहे. याशिवाय ठाणे येथे तरुणाच्या मारहाणप्रकरणी निःपक्ष चौकशीसाठी संबंधित मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा द्यावा या मागणीचा आम्ही पुनरुच्चार करत असल्याचे निवेदनातुन कळविले आहे.
पालघर येथील संतांची निर्घृण हत्येप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी व कारवाई मागणी