संकटकाळ नव्हे! तर, छंद नि नातेसंबंधाची वीण घट्ट करण्याचा काळ,
लॉकडाऊनचा असाही फायदा,
कुठे कलेला वाव
तर, कुठे चिमुकले लुटतायत विरंगुळाचा मनमुराद आनंद
कारंजा तालुक्यातील चित्र
दीपक पवार...
कारंजा (लाड):- ( कारंजा हुंकार )—
चीनने जगाला दिलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला प्रतिबंध करण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय सर्वत्र घेण्यात आला. यामुळे, कुटूंबाच्या कुटुंब घरात बसून आहेत. एका अर्थाने सारे कुटूंब एकत्रित राहण्याची ही अमूल्य संधी या संकटामुळे आली आहे. सद्य परिस्थितीत बंदिवासात राहायला लागल्याने बोअर होत आहे. मात्र, शहरातील बुद्धिजीवी व्यक्तिमत्वे शिवाय, चिमुकले मुले आपल्या कपाळावर आठ्या आणण्याऐवजी या काळात आपल्या कलागुणांना वाव देत आहे. तर, कोणी घरातील बैठे खेळ-खेळत विरंगुळाचा मनमुराद आनंद लुटतांना दिसत आहे. शिवाय, घरातील थोरली मंडळी आताच्या अतिशय आव्हानात्मक परिस्थितीमध्ये आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या नातेसंबंधाची जपणूक व सहवास याला प्राधान्य देत ही नातेसंबंधांची वीण अधिक घट्ट कशी होईल. याला अधोरेखित करण्याकडे लक्ष देत असल्याने हा संकटकाळ नव्हे तर, छंद नि नाते संबंध घट्ट करण्याचा काळ असल्याचे शहरात दिसून पडत आहे.
अलीकडे लोक कुटुंबाला व कुटुंबसौख्याला शिवाय, आपल्या मध्ये दडलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी आपली नेमकी रुची कशात हे दैनंदिन रुटिंगच्या अभिशापामुळे ओळखण्यास पारखे झालेत आहे. भावनिक बंध कमी झाले. आजमितीला घरात एकत्र बंदिस्त होण्याची ही वेळ म्हणजे कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी संधीच आहे. याच संधीचा शहरातील काही नागरिक पुरेपूर फायदा घेत आहे.
याचाच प्रत्यय म्हणून, स्थानिक म.ब्र. आश्रम शाळेत इयत्ता नवव्या वर्गात शिकणारा शिवाय शहरातील सर्पमित्र म्हणून, सुपरिचत असलेले प्रा.राजा गोरे यांचा मुलगा मल्हार राजा गोरे याने या लॉकडाऊन मध्ये शाडूच्या मातीपासून मूर्ती बनविणेच्या कलेला वाव देत विविध विलोभनीय मुर्त्या साकारल्या आहेत. यामध्ये, गणपती, शिवाजी महाराज, माजी राष्ट्रपती ए.पी.जे. कलाम, संत ज्ञानेश्र्वर, चार्ली चॅप्लिन, मेरा नाम जोकर मधील राजकपूर, स्वामी रामकृष्ण परमहंस, या बहुआयामी व्यक्तिमत्वांची व महान विभूतींची मूर्ती त्याने साकारली आहे. त्यामुळे, त्याच्या कलेचे पंचक्रोशीत कौतुक केले जात आहे.
तर, प्रभाग क्रमांक 2 च्या नगरसेविका नंदा किशोर जिचकार यांनी आपल्या घरातील मुलांना विरंगुळा म्हणून घरातील बैठे खेळ खेळण्याकरिता दालन खुले करून दिले आहे. विशेष, म्हणजे त्यांनी याचा वेळेनुसार तक्ता सुद्धा तयार केला आहे. यामध्ये, प्राणायाम, बुद्धिबळ, कॅरम, आजीच्या गोष्टी अशा, खेळांना वाव देत ही बच्चे कंपनी विरंगुळाचा मनमुराद आनंद लुटत आहे.
बंदिस्त झाल्याप्रमाणे न वागता घरातील उपलब्ध साहित्य आणि वस्तूंच्या साहाय्याने ज्याला जे जमेल त्याने ते मन लावून करावे. त्यामुळे, समाधान लाभेल, नवनिर्मितीचा आनंद लाभत आपल्या कलाविष्काराला वाव मिळत या संकटकाळी परिस्थितीला मात देत सुद्धा एक नवे दालन खुले होईल अशी प्रतिक्रिया मल्हार राजा गोरे याने दिली.