जिल्हाबंदी असतांनाही परजिल्ह्यातील 18 नागरिक कारंजा तालुक्यात दाखल
पुणे, सुरत, निझामाबाद व अकोला येथील नागरिकांचा समावेश, पोलीस प्रशासनाच्या कारवाईकडे लक्ष
कारंजा : (कारंजा हुंकार )
कोरोना विषाणूचा संसर्ग पसरू नये यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार वाशिम जिल्ह्याच्या सर्व सिमा सिल करण्यात आल्या असून कारंजा उपविभागात 10 ठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. तरीही 17 एप्रिल रोजी कारंजा तालुक्यात परजिल्ह्यातील 18 नागरिक दाखल झाल्याचा प्रकार उघडकिस आल्याने खळबळ उडाली असून दाखल होणार्या नागरिकांवर पोलीस प्रशासनाकडून काय कारवाई केल्या जाते याकडे तालुकावासियांचे लक्ष लागले आहे. वाशिम जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी कालपरवाच संचारबंदी व जिल्हाबंदी आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे सांगत रितसर पूर्व परवानगी न घेता जिल्ह्यात दाखल होणार्या नागरिकांना जिल्ह्याबाहेर काढून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु तरीही कारंजा तालुक्यात परजिल्ह्यातील 18 नागरिक दाखल झाल्याने पोलीस प्रशासनाच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सदर नागरिकांची कारंजा उपजिल्हा रूग्णालयात प्राथमिक तपासणी करण्यात आली. परंतु सदर रूग्णालयात तपासणीसाठी लागणारी यंत्रसामग्री उपलब्ध नसल्याने दाखल झालेले नागरिक कोरोनाबाधित आहे की नाही, हे स्पष्ट होऊ शकले नाही. तपासणीनंतर सदर नागरिक आपआपल्या गावी निघून गेल्याची माहिती देखील पुढे आली आहे. प्राप्त माहितीनुसार, 17 एप्रिल रेाजी कारंजा तालुक्यात अकोला मार्गे 18 नागरिक दाखल झाले. यात निजामाबाद येथून आलेल्या रहिम यदु पप्पुवाले, पुण्यावरून आलेल्या नवल शंकर एकनार, सुरत येथून आलेल्या पंकज उकंडा चव्हाण व संदिप काशिराम चव्हाण, अकोला येथून आलेल्या दादाराव भागवत कोरनार, जनु डोंगरू करपते, प्रफुल्ल राजेश्वर उंटवार, एंजल चेन्नम नायडु , पवनकुमार, सी राजु बाबु, बी जीवन रोदनम, सिहेल चप्पलनायडु व डी व्यंकटेश यांच्यासह भडशिवनी येथील काही नागरिकांचा समावेश आहे. सदर नागरिक दाखल झाल्याची माहिती पोलीस प्रशासनास देण्यात आली. परंतु अद्यापपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या संदर्भात तहसिलदार यांनी पोलीस प्रशासनास गुन्हे दाखल करण्यासाठी सूचित करण्यात आल्याचे देखील बोलल्या जात आहे. त्यामुळे लाॅकडाऊनच्या काळात जिल्हाबंदी असताना कांरजा तालुक्यात दाखल होणार्या या 18 नागरिकांवर पोलीसांकडून काय कारवाई केल्या जाते याकडे तालुकावासियांचे लक्ष लागले आहे.