14 मे ठरावा बालक दिन —पुंडलिक लसनकुटे
कारंजा लाड — कारंजा हुंकार
आपण लहानपना पासून शाळेत असताना बघत आलो की 14 नोव्हेंबर ला बालक दिन साजरा केल्या जातो. आणि तो का साजरा करतात असे कोणाला विचारले तर उत्तर मिळते... की आजना भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस असतो म्हणून. आहो हे कसं उत्तर?
बालदिन आणि नेहरूंचा जन्मदिवस याचा दूरदूरपर्यंत काही केल्या मला संबंध जोडता आला नाही.
मग विचार आला की बालदिन अश्या व्यक्तीच्या जन्मदिवशी साजरा व्हावा की त्या व्यक्तीचे तसें कार्य असावे, तसं चरित्र असावं नाही का..!
मग कोण आहे इतिहासात अशी व्यक्ती? कोणतं आहे अस नाव इतिहासात..! आणि लक्षात यायला तिळमात्र वेळ लागला नाही की इतिहासात अशी एकच व्यक्ती आहे आणि ते म्हणजे स्वराज्याचे प्रथम युवराज आणि दुसरे छत्रपती म्हणजे संभाजी महाराज.
संभाजी महाराजांचा जन्मदिवस 14 मे बालदिन म्हणून साजरा व्हावा असे मला वाटते ते योग्यच नाही का !... या दिवसाचे महत्व आणि राजांचे कार्य तमाम महाराष्ट्रातील लोकांना माहित आहेच ते मला नव्याने सांगायची मुळीच गरज नाही.. तरीपण मी एकदा त्यांच्या केवळ बालपणातील काही कार्यावर कटाक्ष टाकण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे सगळे मुद्दे स्पष्ट होतील आपल्याला नाही का !
शंभूराजे म्हणजे संभाजी महाराज यांचा जन्म किल्ले पुरंदर येथे 14 मे 1657 ला झाला. सगळीकडे आनंद झाला की स्वराज्याला प्रथम युवराज मिळाले शिवाजी राज्यांना पुत्ररत्न झाले रयतेच्या राजाला जाणत्या राज्याला पुत्ररत्न झाले केवढा तो आनंद स्वराज्यात.
मात्र शिवाजी राजे राजमाता जिजाऊ यांचा आणि रयतेचा आनंद खुप दिवस टिकू शकला नाही कारण महाराणी सईबाई यांनी कायमचे अंथरून धरले. त्यामुळे शंभूराजे यांचा सांभाळ राजमाता जिजाऊ स्वतः करायला लागल्या. आणि शंभूराजे अवघ्या सव्वादोन वर्षाचे असताना सईबाई यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि शंभूराजे मातृप्रेमाला कायमचे मुकले.
त्यामुळे शंभूराज्यांच सर्वांगीण शिक्षण राजमाता जिजाऊंच्या देखरेखीखाली सुरु झालं. शंभूराजे हळू हळू मोठे होऊ लागले आणि केवळ आठ वर्षाचे असताना त्यांना शिवाजी महाराजांसोबत प्रत्यक्ष मृत्यूच्या जबड्यात आग्र्याला जावं लागलं.तिथे औरंग्याने शिवाजी राज्यांना कैदेत टाकले मात्र शंभूराज्यांना दरबारात येण्याजाण्याला मान्यता देण्यात आली. आणि शंभूराजे दरबारात निर्भीडपणे वावरू लागले. एकदा औरंगजेब शंभूराज्यांना म्हणाला तुम्ही उत्तम मल्लविद्या जाणता असे ऐकण्यात आहे तेव्हा आमच्या सभेतील कोणाशी कुस्ती खेळणार तुम्ही? तेव्हा शंभूराज्यांनी औरंग्याच्या नजरेस नजर मिळवून निर्भीड उत्तर दिले की, तुमच्या दरबारीं असा एकही योद्धा नाही जो आमच्याशी कुस्ती खेळू शकेल.
एवढे कणखर आणि कडक शब्दात उत्तर दिले शंभूराज्यांनी तेव्हाच्या आशिया खंडातील सर्वात बलाढ्यशक्ती असलेल्या क्रूर कर्म्या औरंगजेबाला.....
शिवाजी महाराजांनी स्वतःची आणि शंभूराज्यांची आग्र्यावरून सुटका करून घेतली आणि वाटेत कोणी ओळखू नये म्हणून शंभूराज्यांना त्यांना काशीलाच ठेवावं लागलं. त्यावेळी 9 वर्षाचं कोवळं पोर असलेल्या शंभूराज्यांच महाराजांना धीर देणार उत्तर होतं की आबासाहेब तुम्ही जावे स्वराज्यात आणि आमची चिंता मुळीच नसावी.
आहो नऊ वर्षाचं मूल सोडून बाप जात आहे आणि तेसुद्धा हजारो कोस दूर दुश्मनांच्या राज्यात किती आक्रोश करायला पाहिजे होता त्या छोट्याश्या बाळाने मात्र आक्रोश न करता त्यांनी बापाला धीर द्यावा किती ते शौर्य किती तो समज... म्हणूनच वाटते की माझ्या शंभुराज्याचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा व्हावा.. त्यामुळे शंभूराज्यांचा इतिहास ऐकून देशातील तमाम बालकांमध्ये धीर, शौर्य, धाडस आणि निर्णयक्षमतेची निश्चितपणे वाढ होईल असे मला वाटते.
शंभूराज्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी तब्बल तेरा भाषा आत्मसात केल्या होत्या. एकूण सतरा भाषा यायच्या शंभूराज्यांना. त्यामुळेच मला वाटतं की 14 मे ला व्हावा बालदिन साजरा.
वयाच्या चवदाव्या वर्षी शंभूराज्यांनी 'बुधभूषण' नावाचा ग्रंथ लिहिला.एवढ्या कमी वयात ग्रंथ लिहिणारा शंभूराज्यांशिवाय दुसरा कोणी या जगाच्या पाठीवर असेल असे मला नाही वाटत आणि म्हणून वाटत की 14 मे लाच व्हायला पाहिजे बालदिन साजरा.
वयाच्या अकराव्या वर्षी शंभूराज्यांनी पहिली मोहीम राबवली आणि ती सुद्धा यशस्वी.. त्यांच्या आयुष्यात त्यांनी एकशेवीस पेक्षा जास्त लढाया लढल्या आणि सर्वच्या सर्व जिंकल्यासुद्धा.
जगाच्या इतिहासात आयुष्यातील संपूर्ण लढाया जिंकणारा एकमेव राजा म्हणून शंभूराज्यांची नोंद ग्रिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने सुद्धा घेतली आहे..
एवढेच नव्हे तर एकाचवेळी त्यांनी अत्यंत बलाढ्य अशा मोघल, आदिलशहा, इंग्रज, पोर्तुगीज, डच आणि फ्रेंच या सगळ्यांशी लढण्याची मोहीम उघडून ते सतत नऊ वर्ष लढत राहिले.
म्हणून अशा राजाच्या जन्मदिवशी बालकदिन साजरा झाला तर निश्चितपणे देशाचा फायदाच होईल येणाऱ्या पिढ्या कुशल निर्माण होतील. बालपणात एवढी कर्तबगारी करणारा जगाच्या पाठीवर शंभूराज्यांशिवाय दुसरा कोणी असूच शकत नाही.तेव्हा निश्चितच माझ्या मतांवर शिवप्रेमी, शंभूप्रेमिनीच नव्हे तर सर्वांनीच योग्य तो विचार करावा आणि माझा विचार योग्य वाटत असेल तर शंभूराज्यांचा जन्मदिवस 14 मे बालदिन ठरावा आणि सर्वत्र साजरा व्हावा म्हणून प्रयत्न व्हावे... हो प्रयत्न म्हणावेच लागेल कारण चांगला विषय शासनाला सहज लक्षात येतं नाही त्यासाठी नेहमीच प्रयत्न झालेले बघतो आपण.
प्रचंड मोर्चे काढल्याशिवाय त्या कामाचे महत्व शासनाला कधी कळत नाहीच मुळी नाही का !
मला पुन्हा सांगावे वाटते की राजकीय व्यक्तींचे दिवस राजकारणाच्या नावाने साजरे व्हावे... मात्र विशेष दिवस हे विशेष व्यक्तीच्या जन्मदिवशीच साजरे व्हायला पाहिजे... बालदिन साजरा होण्याचा उद्देश काय? देशाचे बालक,युवा यांच्यावरच उद्याचे देशाचे भवितव्य अवलंबून असते.त्यांचे मस्तिष्क बाल्यावस्थेत परिपक्व करणे अत्यंत महत्वाचे असते आणि त्यासाठी त्यांचे समोर तसें आदर्श व्यक्तींचे दाखले देणे त्यांची कर्तबगारी सांगणे फार महत्वाचे म्हणूनच 14 मे बाल दिन ठरला तर त्यांनी केलेले बाल्यावस्थेतील कार्य लहान मुलांना सांगितले जाईल आणि परिणामी त्यांच्यात सुद्धा कमी वयात शंभूराज्यांप्रमाणे अनेक भाषा आत्मसात करण्याची, देशासाठी जगण्यामरण्याची अभ्यासू प्रवृत्ती निर्माण होईल आणि असे झाले तर देशाचे प्रगतीच्या दिशेने पाऊल पटापट पडायला लागतील.... कमीतकमी राज्यशासनाने तरी तातडीने या बाबतीत गंभीरतेने विचार करावा असे मला वाटते.
*धन्यवाद*
*आपलाच शिवशंभु प्रेमी*
*पुंडलिक लसनकुटे*
*7798636169*
मु. वढवी ता. कारंजा जि. वाशिम.